रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर

सध्या दुष्काळाची झळ सर्वत्रच बसू लागली आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक कुटुंबे स्थलांतरित होऊन तालुक्‍यात येऊ लागली आहेत; परंतु येथे दुष्काळाची गडद छाया असल्याने या कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे सध्या करायचे काय, हा प्रश्‍नही रोजगारासाठी आलेल्या कुटुंबीयांवर पडला आहे.

तालुक्‍यात मराठवाडा व विदर्भातील शेतकरी कुटुंबे जून, जुलै महिन्यापर्यंत रोजगाराच्या निमित्ताने येत असतात; परंतु सध्या तालुक्‍यातही दुष्काळाची छाया पडली आहे. मंचर, नारायणगाव, आळेफाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी येत असतात. या ठिकाणावरून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्‍यातील शेतकरी त्यांना आपल्या शेतावर काम करण्यासाठी नेत असतात; परंतु सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडे शेतीची कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आळेफाटा, नारायणगाव याठिकाणी आलेले मजूर सध्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असून यावर्षी परिसरात रोजगार मिळणार नसल्याने त्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी रोजगार उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

दुष्काळाचा सामना करायचा कसा हा प्रश्‍न मात्र सर्वांसमोर उभा राहिला आहे. बागायती तालुका म्हणून आंबेगाव तालुका ओळखला जातो. सद्यस्थितीत घोड आणि मीनानदी पात्रातील पाणी संपल्याने शेतीपंपाच्या मोटारी बंद पडल्या आहेत. शेती पिकांना पाणी नसल्याने पिके करपून जाऊ लागली आहेत. दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनातही घट झाली आहे. शेतातील पिके करपल्याने शेतकऱ्यांनाही काम उरले नाहीत. त्यामुळे बाहेरुन रोजगारासाठी आलेल्या कुटुंबीयांना कसे काम देयचे, असा यक्ष प्रश्‍न शेतकऱ्यांनाही पडला आहे. दुष्काळामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. बागायती तालुक्‍यात येऊन देखील रोजगार मिळत नसल्यामुळे तरुणांनी चिंता व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.