सातारा – अभिनेत्री जया पाटील (वय ५६) यांची चार दिवसांपूर्वी गळा चिरून हत्या झाल्याचे समोर आले होते. सातारा येथील गजानन हौउसिंग सोसायटी, कृष्णा नगर येथे त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. मात्र पाटील यांची हत्या, अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चंदगड येथील आरोपी युवकाला अटक केली आहे. आनंत दाजीबा पेडणेकर असं, आरोपीचे नाव आहे. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विविध मालिकांमध्ये आणि ताटातूट या वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या जया पाटील यांची शनिवारी हत्या करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहता, पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. यामध्ये जया पाटील यांनी वारंवार फोन केलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला.
यानुसार आनंत पेडणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला पेडणेकर याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. अभिनेत्री जया पाटील अनैतिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होत्या. त्यामुळे त्यांचा खून केल्याचे पेडणेकरने पोलिसांना सांगितले.
पेडणेकर याची प्रवासादरम्यान जया पाटील यांच्याशी ओळख झाली होती. तो दोन-तीन वेळा त्यांच्या घरी गेला होता. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधांमध्ये झाले. खुनाच्या दिवशी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी पेडणेकर याने जया पाटील यांच्याच घरातील धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केल्याचे स्पष्ट झाले.