मांडवगण फराटा – मांडवगण फराटा येथे कुठल्या तरी वस्तूने डोक्यात, तोंडावर, पाठीत व हातावर मारहाण करून त्यास जीवे मारल्याप्रकरणी एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माने वस्ताद उर्फ प्रकाश तुकाराम माने (वय 65 रा. मांडवगण फराटा ता. शिरूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष बापुराव रूपनवर यांनी फिर्याद दिली असून अजय उर्फ बाळू राजू घोडके वय 19 रा. मांडवगण फराटा असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहीती अशी कि दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा गावात बाभुळसर रोड चौकात मयत माने वस्ताद व आरोपी बाळू राजू घोडके यांच्यात कुठल्या तरी कारणावरून भांडणे होऊन त्यामध्ये आरोपी अजय घोडके याने मयत प्रकाश माने यास कुठल्या तरी वस्तूने डोक्यात तोंडावर, पाठीत व हातावर मारहाण करून त्यास जीवे ठार मारून तो मयत झाल्यानंतर त्याचे प्रेत तेथेच टाकून निघून गेला. म्हणून घोडके याच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे असे तक्रारीत म्हटले आहे.
पुढील तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे हे करत आहेत.