पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह हडपसर येथील कॅनॉलमध्ये टाकून देण्यात आला होता. संबंधीत तरुणाच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार मे महिन्यात हडपसर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान त्याचा मृतदेह कॅनॉलमधून वाहत यवत येथे सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासाच ही बाब उघड झाली. आरोपी मित्राला गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे.
विशाल उर्फ विक्की राजु पिल्ले (24, रा. हिंगणेमळा, हडपसर) याच्या खूनप्रकरणी विक्की अशोक रणदीवे (रा.म्हाडा कॉलनी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. 10 मे रोजी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विशाल हा बेपत्ता झाल्याबाबत त्याचा भाऊ चेतन नाजु पिल्ले याने तक्रार दिली होती. दरम्यान 15 मे रोजी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॅनोलमध्ये एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह वाहत आला होता. त्यानंतर 18 मे रोजी चेतन याला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्याने हा मृतदेह विशालचाच असल्याचे सांगितले.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलिस नाईक मोहसीन शेख यांना विशाल याचा खून त्याचा मित्र रणदिवे याने दारू पिताना झालेल्या वादातून केल्याची खबर मिळाली. तसेच त्यानेच पुरावा नष्ट करण्यासाठी विशालचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रताप शेळके, कर्मचारी किशोर वग्गु , मोहसीन शेख यांनी रणदिवेच्या हालचालीवर पाळत ठेवली. त्याच्या हालचालीही संशयास्पद आढळून आल्यानंतर त्याला तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. पोलिशी खाक्या दाखवताच विशालचा गळा दाबून खुन केल्याचे कबूल केले.
मृतदेह स्कुटरवरुन नेला कॅनॉल पर्यंत
खून झालेला विशाल आणि आरोपी रणदिवे हे दोघेही मित्र आहेत. दि.10 मे रोजी रेल्वे रूळाच्या पलीकडे नाल्याच्या बाजुला ते झाडाखाली दारू पित बसले होते. त्यावेळी दोघांच्या वाद झाले. यानंतर रणदिवेने विशालचा गळा आवळून खून केला. यानंतर रणदिवे घरी गेला. मात्र परत तो रात्री उशीरा घटनास्थळावर गेला. त्याने विशालचा मृतदेह विगो गाडीवर ठेवून हडपसर ससाणेनगर येथील कॅनॉलवर जाऊन टाकून दिला.
अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक जयंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी किशोर वग्गू, मोहसीन शेख, चंद्रकांत महाजन, गोपाळ मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.