नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये एका जैन साधूची हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज जंतर मंतरवर जैन समुदायाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या हत्येचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कर्नाटकमध्ये बेळगावी जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला जैन साधू आचार्य श्री कामाकुमारा नंदी महाराज यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. या महाराजांच्या शरीराचे तुकडे चिकोडी तालुक्यातल्या रायबाग येथील एका विहीरीमध्ये फेकून देण्यात आल्याचे उघड झाले होते.
महाराज बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असतानाच त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. या गुन्ह्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 8 जुलै रोजी सांगितले की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींना न्यायालयाकडून शिक्षा होईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींना कडक शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र सीबीआय तपासाची मागणी त्यांनी फेटाळली होती.
आज जंतर मंतरवर झालेल्या निदर्शनाच्यावेळी जैन साधू चारुकिर्ती स्वामी यांनी संताप व्यक्त केला. आपली निदर्शने कोणत्याही एका राजकीय पक्षाच्याविरोधात नसून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा छडा लावावा, या मागणीसाठी आहे, असे ते म्हणाले. या हत्या प्रकरणी कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने कोणतीही मदत केली नाही, अशी टीका निदर्शक जितेंद्र कुमार यांनी केली.
महाराजांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली जात आहेत. संपूर्ण समुदायाला न्याय मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. हत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा आणि साधूंचे रक्षण करण्याची मागणी यावेळी भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल जैन यांनी केली.