नियंत्रण कक्षालाही मिळेना बेडची माहिती : डॅशबोर्डवर अजूनही खोटीच माहिती
पुणे – खासगी हॉस्पिटलकडून ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडची माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे माहितीचा आढावा घेण्यासाठी पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये आपले कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच स्वतंत्र नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे. मात्र, या कक्षाच्या अधिकाऱ्यांनाही हॉस्पिटल माहितीच देत नाही. नियंत्रण कक्षातून फोन गेल्यानंतर दोन ते तीन तास कोणतीही माहिती कळविली जात नाही. तसेच, या कक्षाचा फोनही उचलला जात नाही. त्यामुळे महापालिकाही खासगी हॉस्पिटलपुढे हतबल झाली आहे.
हॉस्पिटलमधील बेडची माहिती रुग्णांना उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विभागीय आयुक्तांकडून डॅशबोर्ड उपलब्ध करून दिला. मात्र, तो अपडेट होत नसल्याने रुग्णांना बेड मिळत नाही तसेच उपचाराअभावी प्राण सोडावे लागत आहे. हे प्रकार वाढत असल्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेत डॅशबोर्ड अपडेटसाठी पालिकेने स्वत:चे कर्मचारी थेट रुग्णालयात नेमावे तसेच नियंत्रण कक्ष सुरू करावा, असे आदेश दिले. त्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये दररोज जाऊन तपासणी करण्यासाठी 27 उपअधिक्षक नेमले. याशिवाय, ही माहिती अपडेटसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू केला.
नागरिक देतात शिव्या…
हा नियंत्रण कक्ष महापालिकेकडून चालविला जातो. त्यामुळे या ठिकाणी फोन केल्यानंतर आपल्याला बेड मिळेल असा विश्वास रुग्णांच्या नातेवाईकांना असतो. मात्र, या कक्षातूनही बेड मिळण्यास उशीर होत असल्याचे दिसताच रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी असलेल्या ऑपरेटर तसेच अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ करतात. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांची मनस्थिती माहीत असल्याने या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रीया न देता सर्व काही ऐकून घेतले जाते.
महापालिकेचा फोन कॉलही दुर्लक्षित…
पालिकेच्या नियंत्रण कक्षात बेडसाठी फोन आल्यानंतर या कक्षातून विभागीय आयुक्तांचा डॅशबोर्ड चेक केला जातो. त्यात, ज्या ठिकाणी जिथे ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर आहे, अशा हॉस्पिटलला या कक्षातून फोन करून बेडबाबत विचारणा केली जाते. मात्र, त्यांच्याकडून बेड ऑनलाइन दिसत असला तरी बेड शिल्लक नसल्याचे सांगतात. तर, पालिकेच्या कक्षातून बोलत असून ऑनलाइनला बेड दिसतोय असे हॉस्पिटलला सांगताच, आपल्याला कल्पना नाही दुसऱ्या सरांना बोलावतो असे सांगून फोनचा रिसिव्हर तब्बल अर्धातास बाजूला ठेवला जातो. तर, एका मिनिटात माहिती घेऊन कळवतो, असे सांगत तीन ते चार तास काहीच माहिती या कक्षालाही कळविली जात नाही.