महापालिका कर्मचाऱ्यांची “दिवाळी’ संपेना

पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल महिनाभर महापालिकेच्या कामकाजाचा खोळंबा झाला. त्यातच सलग 5 दिवस सुट्ट्या मिळूनही महापालिका अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या “मूड’मधून बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे सुट्ट्या संपल्या तरी महापालिकेत शुकशुकाट पसरला आहे.

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, कार्यकर्त्यांचा कायम राबता असतो. अधिकारी, कर्मचारी, नागरिकांमुळे महापालिकेची दालने गर्दीने फुललेली असतात. विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. त्यासाठी 21 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली. महापालिकेचे बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी वर्ग करण्यात आले. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाची वाणवा होती. त्यातच पदाधिकारी, नगरसेवक महापालिकेकडे फिरकले नाहीत.

निवडणुकीचा निकाल लागताच दुसऱ्या दिवसापासून दिवाळी सुरु झाली. 25 ते 29 ऑक्‍टोबर अशा सलग पाच दिवस महापालिकेला दिवाळी सणानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आज (बुधवार) महापालिकेचे कामकाज पूर्ववत सुरु होणे अपेक्षित होते.

मात्र, सुट्टीच्या मूडमध्ये असलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी “दांडी’ मारली. त्यामुळे महापालिकेत शुकशुकाट पसरला होता. महापौर राहुल जाधव वगळता अन्य पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची दालने देखील ओस पडली होती. महिनाभर कामांचा खोळंबा झाल्याने ती मार्गी लावण्यासाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.