पिंपरी – नव्याने अस्तित्वात येत असलेल्या भाजपा सरकारमध्ये शहरातून मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले असून लक्ष्मण जगताप की महेश लांडगे यावर आता चर्चा घडू लागल्या आहेत. मावळातून बाळा भेगडे यांचा पराभव झाल्यामुळे शहरातील दोन्हीही आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांच्या समर्थक़ांनी बॅनरबाजी करत शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जगताप की लांडगे; राजकीय वर्तुळात चर्चा
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन पैकी दोन जागा भाजपाच्या वाट्याला आल्या होत्या. या दोन्ही जागा राखण्यात विद्यमान आमदारांना यश आले. गतवेळेपेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय महेश लांडगे यांनी मिळविला. तर लक्ष्मण जगताप यांनीही हॅटट्रीक साधली. यावेळी त्यांचे मताधिक्य काहीसे घटले असले तरी चिंचवड विधानसभेतून तीनवेळा आमदार होण्याचा मान लक्ष्मण जगताप यांना मिळाला. दोन्ही आमदार हे भाजपामध्ये फडणवीस यांच्याच जवळचे मानले जातात. दोघांचीही महत्त्वकांक्षा ही मंत्री होण्याची असल्याचे आजपर्यंत लपून राहिलेले नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्मण जगताप यांची वर्णी लागणार असे सांगण्यात येत होते. मात्र मावळचे तात्कालीन आमदार बाळा भेगडे यांना संधी देण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भेगडे यांचा पराभव झाल्यामुळे भेगडे यांच्या वाट्याला आलेले मंत्रीपद शहरातील आमदाराला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहरातही हॅटट्रिक साधणारे भीमराव महाडिक आणि माधुरी मिसाळ हे दोनच आमदार आहेत. पुणे जिल्ह्याच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामधील एक पद पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल असा दावा केला जात आहे. हॅटट्रिकमुळे लक्ष्मण जगताप यांचे नाव आघाडीवर असले तरी मोठे मताधिक्य मिळविल्यामुळे महेश लांडगे यांच्या समर्थकांनीही जोर लावला आहे.
चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी “मंत्रीसाहेब’ या मथळ्याखाली फलकबाजी केली आहे. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे यावेळच्या मंत्रिमंडळात शहरातील आमदाराची वर्णी लागेल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असला तरी जगताप की लांडगे याबाबत मात्र तर्कवितर्क लढविले जात आहेत.