हडपसर, दि. 11 (प्रतिनिधी) -राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. पहिल्या टप्पातील 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातही 7 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमुळे आयोग पुन्हा “ऍक्शन मोड’मध्ये आल्याने राज्यभरात रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महापालिका निवडणुकांही जाहीर केल्या जातील, असे अंदाज लावले जात आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महापालिका निवडणुकीसाठी “इच्छुक’ असलेल्यांनी गाफिल राहू नये, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर पहिल्या टप्पात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका रखडल्या होत्या. आता, निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आचारसंहिताही लागू केली आहे. दि. 18 डिसेंबरला मतदान तर दि. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच्या टप्यात जिल्हा परिषद, पंचायत सिमतीसह महापालिकेच्या निवडणुकाही जाहीर होऊ शकतात. जि.प. आणि पं.स. निवडणूक फेब्रूवारीपर्यंत उरकल्यास महापालिका निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी 2023च्या दरम्यान जाहीर झाल्यास मार्च मध्ये अथवा एप्रिलच्या सुरवातीस महापालिका निवडणूक होऊ शकते, असे अंदाज वर्तविले जात आहेत.
पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी 2022 मध्ये होणार होती, ती विविध कारणांनी वर्षभर लांबल्याने आता नव्या 2023 या वर्षाच्या सुरवातीसच निवडणूक होईल, असे राजकीय क्षेत्रातील अनेक जण ठामपणे सांगत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुदत संपलेल्या महापालिकांवर तसेच नगरपरिषदांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. नियमानुसार प्रशासकांचा नेमणूक कालावधी संपलेला आहे. त्यामुळे निवडणूका घेण्याबाबत आयोगाकडूनही तयारी केली जाऊ शकते. सुरवातीला राज्यातील ग्रामपंचातीच्या निवडणूका झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यानुसार आता राज्यातील दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रमही आयोगाकडून जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा राजकीय क्षेत्रातील अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.