पुणे – करोना नियंत्रित करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका आता खासगी लॅबबरोबर करार करणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरांत करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोथरुड-बावधन, बाणेर-बालेवाडी, वारजे-कर्वेनगर आदी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मर्यादित असलेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण सरासरी 400च्या पुढे गेले आहे.
शहराच्या पूर्वभागात रुग्ण संख्या वाढली तेव्हापासूनच चाचण्यांचे प्रमाण वाढवले पाहीजे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून केली जात होती.
त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारनेही चाचण्यांचे नवीन दर निश्चित केले असून, आय.सी.एम.आर मान्यताप्राप्त लॅबमधून करोनाची चाचणी केल्यास दोन हजार 200 रुपये आणि घरी येऊन चाचणी केल्यास 2 हजार 800 रुपये इतके शुल्क निश्चित केले आहे.
त्यानुसार चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी मान्यताप्राप्त लॅबकडून चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लॅबबरोबर करार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहीती अध्यक्ष हेमंत रासने यांनी यावेळी दिली.