विकासकामांच्या तरतुदींकडे लक्ष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सन 2020-21 या वर्षाचे अंदाजपत्रक सोमवारी (दि. 17) होणाऱ्या स्थायी समितीसमोर कलम 95 अन्वये आयुक्त श्रावण हर्डीकर सादर करणार आहेत. महापालिकेचे हे 38 वे अंदाजपत्रक आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक पावलेली आहे. शहराची गेल्या दहा वर्षांत प्रचंड वेगाने झालेली वाढ आणि महापालिकेचा वाढलेला महसूल यामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकातही गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी एक हजार कोटींची वाढ होत आहे.
सन 2019-20 चे अंदाजपत्रक हे सहा हजार दोनशे कोटींचे होते. तर सन 2018-19 चे अंदाजपत्रक हे पाच हजार कोटींपेक्षा अधिकचे होते. त्यामुळे यावर्षी अंदाजपत्रक किती कोटींचे असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढलेला महसुली खर्च, भांडवली खर्चासाठी नगरसेवकांची आग्रही मागणी आणि घटणारे उत्पन्न यामुळे अंदाजपत्रक तयार करताना आयुक्तांनी कोणत्या बाबींना महत्त्व दिले आहे ते आज स्पष्ट होणार आहे. नागरी सुविधांवर भर देण्याची मागणी होत होती. त्याची दखल आयुक्तांनी घेतली का? हे देखील स्पष्ट होणार आहे.