पिंपरी, दि. 21 – सुमारे एक लाख रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. महापालिका मुख्यालयातील पाणीपुरवठा विभागात मंगळवारी (दि. 21) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दिलीप आडे असे रंगेहाथ पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका मुख्यालयातील पाणीपुरवठा विभागात आडे लिपिक पदावर कार्यरत आहेत. एक काम मार्गी लावण्याकरिता त्याने ठेकेदाराकडे लाचेची मागणी केली होती. या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून आडे याला लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
महापालिकेत प्रशासकीय राजवट असून, स्थायी समितीची बैठक सुरु असताना ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली.