नगर -शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे दिसून आली. ही गोष्ट लक्षात येताच आज शुक्रवारी दुपारी पुन्हा या अतिक्रमणांवर हातोडा पडला. महापालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढून टाकली.
काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी एकत्र येत बाजारपेठेतील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवला होता. मंगळवारी दिवसभर व्यापाऱ्यांनी उपोषणही केले होते. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनास राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर या अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते.
त्यानंतर गुरुवारी मोची गल्ली, कापड बाजार, गंज बाजार परिसरातील अतिक्रमणे पुन्हा “जैसे थे’ झाल्याने या प्रकाराची माहिती व्यापारी महासंघाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पोलीस बंदोबस्तात मोची गल्ली, कापड बाजार, गंज बाजार परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. दरम्यान, शहरातील बाजारपेठांमध्ये अतिक्रमणांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही थोड्याच दिवसात पुन्हा अतिक्रमणे होतात हा नेहमीचा अनुभव आहे.