मुंबई -राज्यात करोना संसर्गाच संकट गडद होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात करोना नियम कडक करण्यात आले असून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणीदेखील मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. यावरून आज पत्रकारांशी बोलतांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी “साहेब! हाथ जोडून विनंती करते मास्क घाला” अशी विनंती राज ठाकरे यांना केली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,‘आपण हजारो लोकांचे आयडॉल आहात. अनेक लोक आपल्याकडे बघून प्रभावित होतात. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना कृपया मास्कचा वापर करावा. आपण मास्क घालत नसल्यामुळे अनेक जण या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत. आपल्या घरातही वयोवृद्ध मंडळी आहेत. या गोष्टी विचारात घेऊन आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्क घालावा, ही हात जोडून विनंती आहे,’ असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.’