– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सने पराभवाने सुरुवात केली. पहिले काही सामने पराभव स्वीकारण्याची त्यांची सवय कधी सुटणार ते कोण सांगेल का. पराभव आणि विजय हे खेळाचा भाग असतात पण जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभूत होणारा मुंबई इंडियन्सचा संघ पराभवातूनही आनंद मानत आहे. का तर म्हणे पहिले काही पराभव आमच्यासाठी लकी असतात हेच त्यांचेच काही खेळाडू अभिमानाने सांगतात.
सध्या मुंबईचा संघ एका वेगळ्याच स्थितीत आहे. कर्णधार व हिटमॅन रोहित शर्मा याच स्पर्धेत सातत्य राखून भारतीय संघात आला होता व आता तर काय तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात कर्णधारही बनला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रोहितची फलंदाजी पाहिली की हाच का तो रोहित शर्मा असा प्रश्न पडतो.
यंदाच्या मोसमातील सलामीच्या लढतीत रोहितने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 41 धावांची खेळी केली. दुसरा सामना राजस्थानशी होता व त्यात रोहितला केवळ 10 धावाच करता आल्या. तो सुरुवात थाटात करत आहे पण मग काहीतरी बिनसते व तो अत्यंत अपरिपक्व फटका मारून बाद होत आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून केवळ आरंभशूर बनला आहे. इनकमिंग किंवा इन कटर चेंडूंवर तो सातत्याने बाद होत आहे. तसेच त्याचा प्रसिद्ध फटका पूल असला तरीही तो आता त्यातच चूक करताना दिसतो.
बॉर्न टू रुल अशी बिरुदावली मिरवत तो भारतीय क्रिकेटमध्ये नावारुपाला आला पण आता बॉर्न टू फेल वाटत आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जात असेला रोहित मुंबईच्या पाच विजेतेपदांचा शिल्पकार आहे. चेंडूपर्यंत त्याचे पाय येत नाहीत, त्याचे डोकेही स्थिर नसते, चेंडू फटकावताना त्याची बॅटवरील ग्रीपही अवे फ्रॉम द बॉडी असते.
हे तंत्र नव्हे हे त्यालाही समजत असेल पण तरीही तो चुकत आहे. मास्टर ब्लास्टर व मुंबई संघाचा मेंटॉर सचिन तेंडुलकर याला मदतीला घेऊन नेटमध्ये रोहितने आपले तंत्र भक्कम करावे व चौकार, षटकारांची बरसात करावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. खेळपट्टीवर आल्यावर लगेचच राज्य सुरू करणारा रोहित आज मांडलीक झालेला दिसत आहे व चाहत्यांसाठी ते प्रचंड त्रासदायक ठरत आहे. ही स्पर्धा अजून बाकी आहे व रोहितमधला तो जुना हिटमॅन लवकरच दिसावा अशी अपेक्षा आहे.