देहरादून – पुष्पा मुंजियाल, हे नाव सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. कारण, त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. यासाठी त्यांनी डेहराडून न्यायालयात मृत्यूपत्रही सादर केलं आहे.
पुष्पा मुंजियाल या उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधील नेहरू कॉलनी दलनवाला येथील रहिवासी आहेत. राहुल गांधींच्या विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव असल्याचं पुष्पा सांगतात. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच आपले सर्वोच्च बलिदान दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पुष्पा पुढं म्हणाल्या की, गांधी परिवाराने देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. न्यायालयात मालमत्तेची माहिती देताना पुष्पा यांनी राहुल गांधींच्या नावाने मृत्युपत्र सादर केले. तसेच माझ्यानंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
पुष्पा मुंजियाल यांच्याकडे 50 लाखांची एफडी आणि 10 तोळे सोने असल्याचेही सांगितले जात आहे.
काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा म्हणाले की, डेहराडूनच्या रहिवासी पुष्पा मुंजियाल यांच्यावर राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाचा खूप प्रभाव आहे. अशा परिस्थितीत त्यांनी यमुना कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना सुपूर्द केले आहे.