मुंबई – देशात करोना विषाणूची पहिली लाट आल्यापासून महाराष्ट्र बाधितांच्या संख्येबाबत अव्वल ठरलं आहे. अशातच दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यात कमी झालेली करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. एकीकडे रुग्णसंख्येत पडलेली भर तर दुसरीकडे ‘ओमायक्रॉन’ने वाढलेल्या चिंतेमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
राज्यात आढळत असलेल्या एकूण रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई शहरामध्ये आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये एकट्या मुंबई शहरामध्ये ३६७१ रुग्णांची भर पडली आहे. ही रुग्णसंख्या बुधवारच्या आकडेवारीपेक्षा ४६ टक्क्यांनी अधिक आहे. रुग्णसंख्येतील ही वाढ गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाचपट आहे. तर दुसरीकडे राज्यात आज ५३६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी टास्क फोर्ससोबत एक बैठक घेतली. प्राप्त माहितीनुसार या बैठकीमध्ये ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे काय याबाबत चर्चा झाली.
दरम्यान, मुंबईत आज वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे शहरातील सक्रिय बाधितांचा आकडा ११३६० वर जाऊन पोहोचला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी मुंबईतील धारावी या झोपडपट्टी भागामध्ये २० रुग्ण आढळले आहेत. ही धारावीमध्ये १८ मेनंतर आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.