पुणे – लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड खडकी स्टेशन दरम्यान सिग्नलच्या कामासाठी येत्या रविवारी (दि. 20 ऑगस्ट) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकल आणि पुणे-मुंबई धावणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, लांब पल्ल्याच्या ट्रेन उशिराने धावणार आहे.
पुणे विभागातील लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड खडकी स्टेशनदरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दि. 20 ऑगस्ट मार्गावरील गाडी क्रमांक 12127/12128 पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी, 11007/11008 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन, 12125/12126 पुणे-मुंबई-पुणे प्रगती आणि 11029/11030 मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच तळेगाव, पुणे, लोणावळा, शिवाजीनगर येथून सकाळी पावणेसात ते दुपारी सव्वाचारपर्यंत सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.
तर, रेल्वे क्रमांक 12939 पुणे-जयपूर एक्सप्रेस पुण्यातून 17.30 ऐवजी 17.45 वाजता सुटेल. रेल्वे क्रमांक 22943 दौंड-इंदौर एक्स्प्रेस दौंडवरून नियमित प्रस्थान वेळ दुपारी दोनऐवजी सहा वाजता सुटेल. मुंबई-चेन्नई, लोकमान्य टिळक टर्मिनस – काकिनाडा पोर्ट, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई – हैदराबाद आणि दि. 19 ऑगस्टला सुटणारी गाडी क्रमांक 16332 त्रिवेंद्रम-मुंबई, 11302 बंगळुरू- मुंबई, 22194 ग्वालियर- दौंड एक्स्प्रेस या ट्रेनवरील कामामुळे पुणे विभागावर काही विलंबाने चालतील.