मुंबईची बडोद्यावर मात

मुंबई: मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याचा 309 धावांनी पराभव केला व विजयी सलामी दिली. दुसरीकडे महाराष्ट्राला हरियाणाकडून एक डाव आणि 68 धावांनी अत्यंत दारुण पराभव पत्करावा लागला. मुंबईने विजयासाठी 534 धावांचे आव्हान बडोद्यासमोर ठेवले होते मात्र, त्यांचा डाव 224 धावांतच संपला. पहिल्या डावात 6 बळी घेणाऱ्या शम्स मुलाणीने दुसऱ्याही डावात 4 गडी बाद करत संपूर्ण सामन्यात 10 बळी घेत सामनावीराचा पुरस्कारही मिळविला. मुंबईने पहिल्या डावात 431 धावा केल्या होत्या.

बडोद्याचा पहिला डाव 307 धावांत संपवत मुंबईने दुसऱ्या डावात 409 धावा केल्या. त्यात पृथ्वी शॉने द्विशतकी तर कर्णधार सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली होती. बडोद्याचा दुसरा डाव 224 धावांत संपवत मुंबईने मोठा विजय मिळविला. रणजी करंडकाच्या इतिहासात मुंबईने सर्वात जास्त वेळा विजेतेपद मिळविले आहे. यंदा देखील संघांचे बलाबल पाहता मुंबईचाच संघ बलाढ्य वाटत आहे. त्यातच पृथ्वी शॉ संघात परतल्याने मुंबईची फलंदाजी आणखी भक्कम झाली आहे.

महाराष्ट्राचा पराभव
रणजी स्पर्धेतील सलामीच्याच लढतीत महाराष्ट्राला हरियाणाकडून एक डाव 68 धावांनी अत्यंत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. हरियाणाने पहिल्या डावात 401 धावा केल्या व महाराष्ट्राचा पहिला डाव 247 धावांत संपूष्टात आणुन त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की लादली. महाराष्ट्राचा दुसरा डाव तर केवळ 86 धावांतच संपला व त्यांना डावाने पराभव स्वीकारावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.