विज्ञानविश्‍व: रोबोटस्‌ची अवकाशभरारी

डॉ. मेघश्री दळवी
अवकाशात माणूस पाठवणे अतिशय जोखमीची बाब असते. विकिरणांमुळे (रेडिएशन) मानवी डीएनएवर विपरीत परिणाम होऊ शकतात आणि कॅन्सरची शक्‍यता वाढते. खास अवकाश पोशाख घालून या विकिरणांचा धोका कमी करता येतो, पण पूर्ण टाळता येत नाही. अवकाश मोहिमेत काही चूक झाल्यास प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. त्यातून सगळं काही सुरळीत पार पडलं तरी अवकाश प्रवाशांसाठी प्राणवायू किंवा अन्नपाण्याची सोय करायला मर्यादा असते. त्यामुळे माणसांच्या ऐवजी अवकाशात रोबोटस्‌ पाठवावेत, निदान आधी रोबोटस्‌ पाठवून जोखमीची कामं त्यांच्याकडून करावी ही कल्पना पुढे आली.

अनोळखी किंवा घातक वातावरणातही रोबोटस्‌ शोधकाची भूमिका पार पाडू शकतात. खोदकाम, बांधकाम, दुरुस्ती, नमुने गोळा करणे, अशी कामं करताना त्यांना कोणतीही अडचण येत नाही. ते थकत नाहीत, आजारी पडत नाहीत आणि बिघडले तर पृथ्वीवरून त्यांच्या दुरुस्तीचे प्रयत्न करता येतात. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी, स्पिरीट आणि क्‍युरिऑसिटी रोव्हर रोबोटस्‌नी अशी साहसी कामगिरी मंगळावर पार पाडली आहे. या यादीत आता भर पडते आहे. जमिनीवर चालणाऱ्या रोव्हर्सनंतर मंगळावर हेलिकॉप्टर रोबोट पाठवण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम नासाने हातात घेतली आहे. जुलै 2020 मध्ये या रोबोटचं प्रक्षेपण करण्यात येईल. मंगळावर घिरट्या घालून बऱ्याच मोठ्या प्रदेशाचं सर्वेक्षण हा बुद्धिमान रोबोट करू शकेल अशी आशा आहे. ऍस्ट्रोबी या घनाकृती रोबोट ड्रोनवर काम सुरू असून या प्रकारचे ड्रोनदेखील सर्वेक्षणासाठी अवकाशात पाठवण्याची योजना आहे.

नासाचा ड्रॅगनफ्लाय ड्रोन 2026 मध्ये निघून 2034 साली शनीच्या टायटन चंद्रावर उतरणार आहे. तिथल्या टेकड्या आणि विवरांचा अभ्यास करून हा बुद्धिमान ड्रोन बरीच महत्त्वाची माहिती मिळवेल अशी अपेक्षा आहे. शनीच्या दुसऱ्या चंद्रावर, एन्सेलेडस्‌वर रोबोसिमियन हा रोबोट पाठवण्याच्या मोहिमेची आखणी सुरू आहे. सिमियन म्हणजे वानरांसारखा हालचाल करू शकणारा हा चार पायांचा रोबोट कणखर असून कोणत्याही प्रदेशात संचार करू शकतो.
ह्यूमनॉइडस्‌ हे माणसासारखे दिसणारे रोबोटस्‌. माणसांना अवकाशात काय समस्या येऊ शकतात याचा अंदाज ह्यूमनॉइडस्‌वरून घेता येईल. म्हणूनच अवकाशात दीर्घ काळासाठी माणूस पाठवण्याआधीचा टप्पा म्हणून ह्यूमनॉइडस्‌ची अवकाशात चाचणी होते आहे.

नासाचा रोबोनॉट 2 हा ह्यूमनॉइड आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात 2011 पासून काम करतो आहे. तिथेच कॅनडाचा डेक्‍स्टर दुरुस्तीची कामं पार पाडतो तर जर्मनीची आइला देखभालीला हातभार लावते. जपानच्या अवकाश संशोधन संस्थेतर्फे किरोबो हा ह्यूमनॉइड 2013 मध्ये अवकाशात चक्‍कर लावून आलाय. रशियाचा फ्योडोर ह्यूमनॉइड नुकताच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची वारी करून आला आहे. आता मंगळावर वस्ती करण्यासाठी म्हणून आर फाइव्ह ह्या ह्यूमनॉइडवर प्रयोग सुरू आहेत. रोबोट्‌सच्या अशा अवकाश भराऱ्या वाढत जाणार आहे यात काही शंकाच नाही!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)