मुंबई – आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा सहभाग असलेली एक जाहिरात सध्या वादात सापडली आहे. या जाहिरातीत धोनी एक बस ड्रायव्हर दाखवला गेला असून तो बस रस्त्यात मध्येच थांबवून आयपीएलचा सामना एका दुकानात लावलेल्या टीव्हीवर पाहात असून यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दाखवले गेले आहे. यावरच आता अनेकांनी आक्षेप घेतल्यावर अॅडव्हर्टायझिंग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) ही जाहिरात बदलण्यास सांगितले आहे.
या जाहिरातीमध्ये धोनीला एक वाहतूक पोलीस कर्मचारी समजावून सांगत असून सामन्यातील सुपरओव्हर सुरू असल्याचे सांगत धोनी हा सामना पाहातच राहतो व हा पोलीस कर्मचारी तेथून निघून जात असल्याचेही दाखवले गेले आहे.
आता या जाहिरातीविरुद्ध कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने एएससीआयकडे तक्रार दाखल केली होती. ग्राहक तक्रार समिती सदस्यांनी ही जाहिरात बनवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बसून ही जाहिरात पाहिली असून ही जाहिरात नियमांचे उल्लंघन करत असल्याचा निर्वाळाही दिला आहे.
येत्या 20 एप्रिलपर्यंत ही जाहिरात हटवा किंवा त्यात बदल करा, असे आदेशही एएससीआयने संबंधित कंपनीला दिले असून या कंपनीनेही ही जाहिरात काढून घेण्याचे मान्य केले आहे.