इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भेट म्हणून मिळालेले महागडे नेकलेस विकण्याचा तपास पाकिस्तानातील सर्वोच्च तपास संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे. हे महागडे नेकलेस भेटवस्तूंच्या सरकारी भांडारात जमा करण्याऐवजी एका ज्वेलरला 18 कोटी रुपयांना विकण्यात आले असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास, करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून केला जाणार आहे.
इम्रान खान यांना पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भेट म्हणून मिळालेले हे महागडे नेकलेस सरकारी भांडारात जमा केले गेलेले नव्हते. ते इम्रान यांचे माजी विशेष सहायक झुल्फिकार बुखारी यांना देण्यात आले. बुखारी यांनी ते नेकलेस लाहोरमधील ज्वेलरला 18 कोटी रुपयांना विकले होते, असे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.
पदावर असताना मिळालेल्या भेटवस्तू सरकारी भांडारात जमा करणे आवश्यक असते. या वस्तूंची अर्धी किंमत देऊन त्या वस्तू स्वतःकडे ठेवता येऊ शकतात. मात्र इम्रान खान यांनी सरकारी तिजोरीत केवळ काही हजार रुपये जमा केले आहेत.