IPL 2024 (SRH vs CSK Match 18, MS Dhoni) : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एक विशेष कामगिरी आपल्या नावावर करू शकतो. धोनी हैदराबादविरुद्ध सहा धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो सीएसकेसाठी 5 हजार धावा पूर्ण करेल. आयपीएल 2024 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला होता.
दिल्लीविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 17 चेंडूंत 31 धावांची खेळी केली. मात्र, धोनीची ही खेळी सीएसकेला विजयापर्यंत नेऊ शकली नाही आणि या हंगामात संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. धोनीने दिल्लीविरुद्धच्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले होते.
रैनाशी बरोबरी करण्याची संधी…
हैदराबादविरुद्ध सहा धावा करून धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी 5000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरेल. त्याच्या आधी संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाने ही कामगिरी केली होती. 2008 ते 2021 दरम्यान सीएसकेसाठी 200 सामने खेळलेल्या रैनाने 33.1 च्या सरासरीने 5 हजार 529 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने दोन शतके आणि 38 अर्धशतके झळकावली आहेत. सध्या रैना हा एकमेव फलंदाज आहे ज्याने CSK साठी 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
CSK साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू…
सुरेश रैना : 5,529 धावा
महेंद्र सिंह धोनी : 4,494 धावा
फाफ डुप्लेसिस : 2,932 धावा
माइक हसी : 2,213 धावा
मुरली विजय : 2,205 धावा
धोनी सुरुवातीपासून CSK सोबत…
आपल्या कर्णधारपदाखाली पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा धोनी 2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासूनच सीएसकेशी जोडला गेला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात दोन संघांसाठी खेळला आहे. CSK व्यतिरिक्त धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे दोन मोसमात प्रतिनिधित्व केले. भारताचा माजी कर्णधार धोनी 2016 ते 2017 या काळात पुणे संघाचा कर्णधार होता. रोहित शर्मासह धोनी हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. मात्र, 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाड यांच्याकडे सोपवली.