अमरावती – राणा कुटुंबियांवरील कोरोना संकट आज अधिक गडद झालं असून खासदार नवनीत राणा यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राणा कुटुंबातील ७ जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बाधितांमध्ये आमदार रवी राणा यांच्या आई-वडिलांचाही समावेश असल्याने ते देखील नागपूरला रवाना झाले. तर मुलांची काळजी घेण्यासाठी नवनीत राणा या घरीच थांबल्या. मात्र आज अस्वस्थ वाटू लागल्याने राणा यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला.
नवनीत राणा यांची रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.