कोल्हापूर : आणखी 2 एनडीआरएफची पथके जिल्ह्यात दाखल

पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीत नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी जिल्ह्यात आज आणखी 2 एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री. पाटील बोलतांना म्हणाले, पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यात 55 बोटी कार्यान्वित आहेत. एनडीआरएफची दोन पथके 15 जुलै रोजी जिल्ह्यात आलेली आहेत. आज आणखी दोन पथके जिल्ह्यात आली आहेत. प्रशासन ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी यावर्षी दक्षता घ्यावी.

काल मुख्यमंत्री महोदयांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य पुराचा धोका याबरोबरच अडीअडचणी संदर्भात सविस्तर माहिती घेतली. प्रशासन गेले पाच महिने कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस काम करीत आहे. पुराच्या वेळीही नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कृपाकरुन गर्दी करु नये. पूर पहाण्यास जावू नये असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

एनडीआरएफची  दोन पथके

पथक प्रमुख शिवप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक पथक 22 जवान 2 बोटीसह  शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे सकाळी रवाना झाले. मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील 22 जवान, 2 बोटीसह कोल्हापूर शहरात तैनात आहे.  आपत्तीमध्ये काम करण्यासाठी एनडीआरएफचे पथक सक्षम असल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.