मुंबई – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दहीहंडी आणि आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक भेटीगाठी घेतल्या. शिवसेनेचे काही खासदार शिंदे यांच्या गटासोबत गेल्यावर खासदार गजानन किर्तीकरही त्यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांना आता किर्तीकर यांनीच पूर्ण विराम दिला आहे. आपल्या मुलाच्या सांगण्यावरून उध्दव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय किर्तीकरांनी घेतल्याचा दावा एका माध्यमाने केला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी लगेचच डागडुजी सुरू केली. त्यांनी अनेक लहान पक्षांना आपल्यासोबत जोडून घेण्याचा आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या मुलांना संधी दिली जात असल्याचे गेल्या काही दिवसांत दाखवून दिले आहे.
गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांचीही शिवसेना उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता अडचणीच्या काळात उध्दव ठाकरे यांची साथ न सोडण्याची गळ अमोल यांनी आपल्या पित्याला घातल्याचा दावा संबंधित माध्यमाने केला आहे. त्यामुळे किर्तीकर सेनेतच राहणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.