खासदार बारणेंचा विकासकामांचा दावा फोल?

किरकोळ कामे वगळता पूर्वीचेच प्रश्‍न कायम

पिंपरी –
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात विकासकामे केल्याचा दावा करीत आहेत. परंतु ते करत असलेले दावा फोल ठरत आहेत. लोकसभेतील उपस्थिती आणि तारांकित प्रश्‍न याच्या जोरावर भाषणबाजी सुरू असली तरी केवळ पासपोर्टचे कार्यालय आणि चापेकरांचे टपाल टिकीट वगळता एकही प्रश्‍न तडीस गेलेला नाही. गत पचंवार्षिक निवडणुकीतील प्रश्‍न या निवडणुकीतही कायम असल्याने युतीच्या उमेदवाराला मतदार स्विकारणार का? हा खरा मुद्दा समोर आला आहे.

रेल्वेचा तिसरा-चौथा ट्रॅक अद्यापही अडगळीत

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर तिसरा आणि चौथा ट्रॅक उभारण्याचे आश्‍वासन बारणे यांनी गतवेळी दिले होते. हे काम मार्गी लावल्याचा दावा त्यांच्याकडून होत असला तरी या मार्गाचे केवळ वारं-वार सर्वेक्षणच झाले आहे. हा ट्रॅक अद्यापही अडगळीत पडला आहे. या मार्गाचे काम अंतिम होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल याचे निश्‍चित उत्तर आजही कोणाकडे नाही. त्यामुळे हे काम मार्गी लावल्याचा दावा बारणे विरोधकांकडून खोडला जात आहे.

एचएचे कामगार 23 महिने पगाराविना

एचए कंपनीच्या पुर्ननिर्मितीसाठी शंभर कोटी मिळाल्याचा दावा बारणे करीत आहेत. मात्र गेल्या 23 महिन्यांपासून हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्‍स (एचए) या कंपनीचे कामगार पगाराविना आहेत. एचएचा प्रश्‍न आपण प्रथम मार्गी लावू असे आश्‍वासन देणाऱ्या बारणे यांच्याकडून हा प्रश्‍न निकाली काढण्याची खऱ्या अर्थाने गरज होती. गेल्या पाच वर्षांत एचएची अवस्था अधिकच बिकट झाली. आता या निवडणुकीतही दोन्ही उमेदवारांकडून एचएच्या प्रश्‍नावर कामगारांना आश्‍वासन देण्याचा प्रकार    सुरू आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार या नात्याने श्रीरंग बारणे यांच्याकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांत नागरिकांच्या हाती निराशाच आल्याचे चित्र आहे. एकेकाळी बेकायदा बांधकामे आणि शास्तीकरावर मोर्चे आणि आंदोलने करणाऱ्या बारणे यांनी खासदार झाल्यानंतर या मात्र या मुद्यांकडे दुर्लक्ष केले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेकाप अशी निवडणूक झाली होती. नागरिकांनी युती आणि श्रीरंग बारणे यांच्यावर विश्‍वास ठेवत त्यांना एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी केले. गजानन बाबर यांच्यानंतर शिवसेनेकडून ते खासदार झाले होते.

बाबर हे त्यांच्या कार्यकाळात अपेक्षित कामे करू न शकल्याने त्यांना बाजूला करून बारणे यांना पक्षाने संधी दिली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत अपेक्षित कामे बारणे यांच्याकडूनही न झाल्याची खंत अनेकजण व्यक्‍त करत आहेत. संरक्षण खात्याकडील प्रलंबित प्रश्‍न, वाढती गुन्हेगारी, मावळ बंद नळ योजना, मावळातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न, प्राधिकरण बाधितांना जमीन परतावा मिळवून देण्याचे आश्‍वासन आदी प्रश्‍न आजही जैसे थे आहेत. “बोलून नाही करून दाखविले’ या टॅगलाईन खाली सध्या बारणे यांचा प्रचार सुरू असला तरी ती यादी त्यांच्याकडून दिली जात आहे, त्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्‍नांना बगल दिली जात असल्याचे मत मतदारांमधून व्यक्‍त होत आहे.

घाटाखाली अनेक विकासकामे केल्याचा दावा केला जात असला तरी तो देखील फोल ठरला आहे. पनवेलमधील सिडकोच्या बांधकामांचा प्रश्‍न आजही कायम आहे. याशिवाय औद्योगिक पट्टयातील मंदी, औद्योगिक परिसरात होणारी दादागिरी, जेएनपीटीच्या समस्या, उरण येथील मच्छीमारांचे प्रश्‍न, रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यात बारणे यांना यश आल्याचे दिसून येत नाही. संसदेमधील अधिवेशनांना हजेरी आणि त्या ठिकाणी उपस्थित केलेले प्रश्‍न हीच त्यांची जमेची बाजू. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आदी मुद्यांवर तारांकित प्रश्‍न उपस्थित केले असले तरी ते प्रश्‍न तडीस नेले नाहीत.
एका बाजूला विकासकामांच्या प्रश्‍नावर ही परिस्थिती असताना मतदारसंघातील युतीमधील वाद देखील बारणे यांना अडचणीचा ठरण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील दोन मतदारसंघ हे बारणेसाठी महत्त्वाचे असून दोन्ही मतदारसंघात साडेसात लाखांहून अधिक मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. मतदानाला केवळ 24 दिवस बाकी असतानादेखील वाद संपुष्टात न आल्यामुळे युतीचे भवितव्य अंधारात आहे. गतवेळी खांद्यास खांदा लावून काम करणारे भाजप नेते यावेळी प्रचारातून गायब झाले आहेत. त्यातच यावेळी पार्थ पवार यांच्या माध्यमातून बारणे यांची लढत थेट पवार घराण्याशी असल्याने खासदारकी टिकविण्यासाठी बारणे निवडणूक यंत्रणा कशी हाताळतात आणि मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साधे पोस्ट कार्यालय उभारता आले नाही

वाल्हेकरवाडी परिसरातून गतवेळी मताधिक्‍य देणाऱ्या नागरिकांची साधी पोस्ट कार्यालयाची मागणी खासदारांनी पूर्ण केली नसल्याची माहिती नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी दिली. वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवड परिसरातून श्रीरंग बारणे यांना गतवेळी नागरिकांनी मोठे मताधिक्‍य दिले होते. रावेत वाल्हेकरवाडी परिसरात सध्या साठ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. येथील नागरिकांनी केवळ पोस्ट कार्यालयाची मागणी केली होती ही मागणी गेल्या पाच वर्षांत देखील खासदार श्रीरंग बारणे हे पूर्ण करू शकले नाहीत. तसेच या परिसरात खासदार म्हणून एकही विकासकाम न केल्याचा दावाही मोरेश्‍वर भोंडवे यांनी केला आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.