“आधीच कमी, त्यातूनही निवडणुकीच्या कामी’

कामाचा ताण वाढला ः निवडणूक आयोगाला 200 पोलीस कर्मचारी देण्यात आले
पोलिसांच्या विविध पथकाद्वारे निवडणूक आयोग करणार कारवाई

पिंपरी  – लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड आयुक्‍तालय सज्ज झाले असून अपुऱ्या मनुष्यबळावर निवडणूक काळात शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मंगळवारपासून अर्ज वाटपाचे काम सुरु झाले असून निवडणूक यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली आहे. निवडणूक आयोगाकडून फ्लाईंग स्क्‍वॉड आणि “स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम’सारखी वेगवेगळी पथके तसेच विभाग तयार करण्यात आले आहेत. यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस आयुक्तालयाचे सुमारे 200 पोलीस कर्मचारी निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. यामुळे मुळातच अतिशय कमी मनुष्यबळात आणि सुविधांच्या अभावात सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर आणखी ताण वाढला आहे.

आयोगाकडून लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 4 “फ्लाईंग स्क्‍वॉड’ आणि 4 “स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम’ तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. तसेच निवडणूक अर्ज दाखल करण्याची ठिकाणे, एक खिडकी योजना, मतदान यंत्र सुरक्षा, संवेदनशील केंद्रांचा आढावा व पाहणी आदी कामांसाठी निवडणूक आयोगाला आयुक्‍तालयाकडून मनुष्यबळ देण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी मनुष्यबळ मागविणण्यात येणार आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्थेची भिस्त अपुऱ्या मनुष्यबळावर असणार आहे.

सुट्ट्यांवर गदा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. न्यायालयीन कामकाज आणि आजारपणाव्यतिरिक्त सुट्ट्या घेण्यात येऊ नयेत अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी सर्व घटप्रमुखांना दिल्या आहेत. खूपच कमी मनुष्यबळात खूप मोठा आणि गंभीर स्वरुपाची गुन्हेगारी असलेल्या विस्ताराच्या सुरक्षेची जबाबदारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयावर आहे. पोलिसांचे संख्याबळ खूप कमी आणि गुन्ह्यांची संख्या खूप अधिक असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना अतिरिक्‍त काम करावे लागते. सुट्टी तर भाग्यानेच मिळते, परंतु आता निवडणूक संपेपर्यंत सुट्ट्यांवर पूर्णपणे गदा आली आहे.

अजून संख्या वाढण्याची शक्‍यता
निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमममध्ये आयुक्तालयाचे 66 अधिकारी व कर्मचारी आहेत. तर फ्लाईंग स्क्‍वॉड (भरारी पथक) मध्ये 14 अधिकारी 39 कर्मचारी आहेत. या व्यतिरिक्त सध्या मतदान मशीन सुरक्षेसाठी बालेवाडी येथे 14 तर भोसरी येथे चार कर्मचारी देण्यात आले आहेत. एक खिडकी योजनेसाठी पाच अधिकारी 15 कर्मचारी देण्यात आले आहेत. तर इतर गोपनीय यंत्रणा आणि अन्य विभागांसाठी 30 ते 40 अधिकारी, कर्मचारी देण्यात आले असून ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

पहिलीच निवडणूक असल्याने अडचणी

मावळ, शिरूर हे दोन मतदार संघ पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. आयुक्‍तालयाच्या हद्दीत सुमारे 365 मतदान केंद्रे असणार आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयाची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्व विभाग आणि आकडेवारी नव्याने तयार करावी लागत आहे. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत योग्य तांत्रिक प्रशिक्षण नसल्याने तसेच आयुक्‍तालयाची परिपूर्ण यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच शहरात निवडणूक आयोगाची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली असून यासाठी आयुक्‍तालयाकडून मनुष्यबळ घेण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.