भोपाळ :- नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्त्याचा मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये मृत्यू झाला आहे. या आठवड्यात मरण पावलेला हा दुसरा चित्ता असून आत्तापर्यंत एकूण आठ चित्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यात पाच मोठे चित्ते आणि तीन पिल्लांचा समावेश आहे. आज मरण पावलेल्या चित्त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. आज मरण पावलेल्या चित्त्याचे नाव सूरज असे ठेवण्यात आले होते.
17 सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त आठ चित्ते येथे सोडले होते. त्यानंतर आणखी बारा चित्ते येथे आणून ठेवण्यात आले होते. त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास लाभावा यासाठीच्या उपाययोजनाही स्थानिक वनअधिकाऱ्यांनी केल्या होत्या. पण हे चित्ते तग धरू शकत नाहीत असे आढळून आले आहे.
नामिबियातून जे चित्ते आणले गेले होते त्यातील एका मादीला येथे चार पिल्ले झाली होती. पण त्यातील तीन पिल्ले दगावली आहेत. चौथ्या पिल्ल्याची प्रकृतीही नाजूक आहे. आता तेथे केवळ पंधरा चित्ते राहिले आहेत.