नऊ जणांची समिती गठीत : 3 महिन्यांत अहवाल सादर करणार
पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी नऊ जणांची समिती गठीत केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
कोणत्याही देशाची प्रगती ही केवळ आर्थिक विकासाच्या कसोटीवर मोजली जात नाही तर ती आता शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा निकषांच्या आधारे मोजली जाते. त्यामध्ये शिक्षणास सर्वाधिक महत्त्व आहे. क्रीडा हा राष्ट्राचा मानबिंदू मानून आंतरराष्ट्रीय संस्थांनी राष्ट्राच्या विकासाची काही नवीन मानके निश्चित केली आहेत. त्यापैकी महत्वाचा निकष म्हणजे मानवी विकास निर्देशांक आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या तयारीसाठी 2 मार्च रोजी मंत्रालयात बैठक झाली होती. त्यात अधिनियम व आवश्यक सूचना करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.
यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, अपर मुख्य सचिव, उपसचिव, क्रीडा व युवक सेवा आयुक्त, मुंबई विद्यापीठाचे डॉ. अनिल कर्णिक, डॉ. विजय तायडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू नीलेश कुलकर्णी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव वाघोले आदींचा समावेशही समितीत करण्यात आली आहे, असे या संबंधीच्या आदेशात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अधिनियमाचे प्रारूप तयार करणे, क्रीडा विद्यापीठच्या अनुषंगाने आवश्यक बाबीच्या शिफारशी करणे, क्रीडा विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत कोर्स सुचविणे आदी कामे समितीला करावी लागणार आहेत. यासाठी महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे अपेक्षित आहे, असे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव स्वा.म.नानल यांनी जारी केले आहेत.