माद्रीद – करोनावर काही लस आल्या असल्या आणि त्या नागरिकांना दिल्या जात असल्या तरी संशोधकांनी अद्याप आपले काम थांबवलेले नाही. त्यांचा अभ्यास सुरू असून त्या अभ्यासांती आता स्पेनच्या संशोधकांनी वेगळा दावा केला आहे.
करोना विरोधी लस आल्यापासून लसीकरणात प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जात आहेत. पहिल्या वेळेस जी लस घेतली त्याच लसीचा दुसरा डोस दिला जातो. अर्थात कोविशिल्ड अथवा कोव्हॅक्सिनचा जो डोस प्रथम घेतला असेल तोच दुसऱ्यांदा दिला जातो.
मात्र दुसऱ्यांदा दुसऱ्या लसीचा डोस घेतला तर ते 30 ते 40 पट प्रभावी ठरत असल्याचे स्पेनमधील संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या लोकांनी अगोदर ऍस्ट्राजेनकाची लस घेतली होती, त्यांना दुसऱ्यांदा फायझर लस देण्यात आली.
त्यावेळी त्यांची प्रतिकार शक्ती खूप वाढल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. सहाशे जणांवर याचा अभ्यास करण्यात आला. त्यातील केवळ 1.7 टक्के लोकांमध्ये स्नायुदुखी अथवा डोकेदुखी असे साइड इफेक्ट आढळून आल्याचे त्यांनी नमूद केले.
लसींचे दोन वेगवेगळे डोस घेण्याच्या संदर्भातील या अभ्यासाला कॉम्बिव्हॅक्स असे नाव देण्यात आले आहे. स्पेनच्या कार्लोस या इन्स्टिट्यूटच्या मदतीने हा अभ्यास करण्यात आला.