पिंपरी -महापालिकेच्या ड प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी ड प्रभागाच्या सभागृहामध्ये जनसंवाद सभा सुरू होती. किमान वेतन कायद्यानुसार वेळेत पगार करावा. पगाराच्या दिवशी पगार स्लिप देण्यात यावी. कामगारांना सुरक्षा व स्वच्छतेचे साहित्य वेळेत मिळावे या मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी हा मोर्चा काढला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्धवेळ सफाई कामगार देण्यात आले आहेत. पूर्वीचे ठेकेदाराला 164 मनुष्यबळ पुरविण्याबाबत आदेश होता. कार्यरत कंत्राटी कामगार हे पूर्णवेळ कामगार होते. परंतु नवीन ठेकेदार यांना पूर्णवेळ 124, अर्धवेळ 36 आणि 4 पर्यवेक्षक असे 164 मनुष्यबळ पुरवण्याबाबत आदेश दिला आहे.
प्रत्यक्षात ड क्षेत्रीय कार्यालयाने जास्त कामगारांची मागणी केली होती. परंतु मागणीनुसार मनुष्यबळ न पुरवता उपलब्ध मनुष्यबळामध्ये कपात करून 164 कर्मचारी दिले. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. कामाचा वाढणारा ताण आणि कामगारांची शारीरिक क्षमता, स्वास्थ्य यांचा विचार न करता आरोग्य विभागाने रस्ते सफाई धोरणात बदल केला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी रयतचे परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, ओमकार भोईर, अजय चव्हाण, महेश लोंढे आणि ड प्रभागातील सर्व कंत्राटी कामगार उपस्थित होते.
दखल न घेतल्याने आंदोलन
दर सोमवारी होणाऱ्या जनसंवाद सभेमध्ये कामगारांना वेळेत पगार आणि पगार स्लिप ठेकेदारांने द्यावी अशी मागणी करत होतो. तसेच सुरक्षेची साधने न पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबतही मागणी केली होती. मात्र वारंवार प्रश्न उपस्थित करूनही संबंधितांवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे हा आंदोलनाचा प्रवित्रा घ्यावा लागला. आता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा एक मे कामगार दिनापासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रयत परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी दिला आहे.