मुजफ्फराबाद – पाक व्याप्त काश्मीरमध्ये एका चिनी कंपनीच्या सहकार्याने नीलम-झेलम नदीवर धरण उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या निषेधार्थ स्थानिकांनी सोमवारी मध्यरात्री रस्त्यावर उतरत मशाल मार्चा काढला.
पाकिस्तान आणि चीनने नुकताच पाक व्याप्त काश्मीरमध्ये हायड्रोपॉवर प्रोजेक्ट उभारणीसंदर्भात करार केला आहे. आजाद पत्तन असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाअंतर्गत चिनी कंपनी झेलम आणि नीलम नदीवर मोठी धरणे बांधून 700 मेगावॅट वीज निर्मातीचा प्रकल्प उभारणार आहे.
या प्रकल्पाचे कंत्राट चिनी कंपनीला देण्यात आले आहे. हा बंधारा म्हणजे चीनच्या महत्वकांशी योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाविरोधात मुजफ्फराबाद शहरामध्ये शेकडोच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, या प्रकल्पासाठी पाकिस्तानने 75 टक्के म्हणजेच 1.23 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. तर 25 टक्के रक्कम ही इक्विटीच्या माध्यमातून उपलब्ध करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वादग्रस्त भूभागावर उभारण्यात येत असल्याने भारताने सुरूवातीपासूनच यावर आक्षेप घेतलेला आहे.