भारतीय वंशाचा व्यक्त केला अभिमान
वॉशिंग्टन – अमेरिका हा वर्णद्वेषी देश बनल्याचे विधान डेमोक्रॅटिक पक्षाकडून सतत केले जात असले तरी त्यात तीळमात्र तथ्य नाही. मी स्वत: भारतीय वंशाची आहे. आपल्या कुटुंबापैकी अनेक जण भारतीय पद्धतीची साडी तसेच फेटा घालतात. मला अमेरिकेत इतकी वर्ष वावरताना अमेरिका वर्णद्वेषी असल्याचा कधीही अनुभव आलेला नाहीं असे प्रतिपादन भारतीय वंशाच्या अमेरिकन नेत्या निक्की हॅले यांनी केला आहे. त्या संयुक्तराष्ट्रातील अमेरिकेच्या माजी प्रतिनिधीही आहेत. त्यांची दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर म्हणून दोनवेळा निवड झाली होती. रिपब्लीकन पक्षाच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी आज हे प्रतिपादन केले.
त्या म्हणाल्या की, माझे आई वडिल भारतातून येथे आले. आजही माझे वडिल फेटा बांधतात आणि माझी आई साडी घालते. त्यांना काही वेळा भेदभावाचा अनुभव आला पण त्यांनी कधीही त्याविषयी तक्रार केली नाही किंवा द्वेष पसरवला नाही. मी भिन्न वंशाची असले तरी दक्षिण कॅरोलिनाच्या नागरीकांनी मला गव्हर्नर होण्याचा मान दिला आहे. त्याचा मला अभिमान आहे असे त्या म्हणाल्या.
अमेरिकेत आज कृष्णवर्णींयांवर हल्ले होण्याचे काहीं प्रकार घडले असले तरी त्या प्रवृत्तीचा येथे कठोरपणे मुकाबला केला जात आहे. काहीवेळा येथे भिन्न वंशाच्या लोकांना अत्यंत विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागले असले तरी आपण अमेरिकेत आहोत याचा आपल्याला अभिमानच वाटत आला आहे असे त्यांनी नमूद केले. या भाषणात त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेने गगन भरारी घेतल्याचा दावा करीत विरोधी बिडेन यांना ट्रम्प यांच्या सारखी कामगिरी जमणार नाही असा दावा केला.