वाटचाल संथ : “स्कायमेट’च्या वृत्तानुसार “अल निनोचा’ प्रभाव
पुणे – जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसल्याने चिंता वाढली असली तरी येत्या 48 तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
सध्या देशात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. त्यातच मान्सून सुद्धा अद्याप दाखल झाला नसल्याने उकाडा वाढला आहे. केरळात साधारण 1 जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर 8 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होतो. पण, यंदा तो अद्याप केरळात दाखल झालेला नाही. यापूर्वी हवामान खात्याने तो 6 जूनदरम्यान दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु, मान्सूनची वाटचाल संथ सुरू असल्याने येत्या 48 तासांत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
“स्कायमेट’ या खासगी वेबसाईटच्या वृत्तानुसार मान्सूनच्या आगमानावर ‘अल निनोचा’ प्रभाव आहे. मान्सूनच्या आगमनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तो भारत भूमिच्या म्हणजे केरळाजवळ आला आहे. पण गेल्या आठवड्यात 27 मे ते 3 जून दरम्यानच्या काळात समुद्रावरील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हा “अल निनो’ आणखी मजबूत बनला आहे. त्याचा परिणाम पावसावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात मान्सूनचे आगमन होईल, पण त्यानंतर तो संथ राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान खात्याने सुद्धा राज्यात आगामी काळात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आगामी दोन दिवस या सरी कोसळतील असा अंदाज आहे.
राज्यात अद्यापही उष्णतेची लाट कायम
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात असणारी उष्णतेची लाट जून महिना सुरू झाला तरी अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. गुरुवारी सुद्धा राज्यातील सर्वाधिक तापमान हे ब्रम्हपुरी येथे 47.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. याशिवाय, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अद्याप ही उष्णतेची लाट कायम आहे. अनेक ठिकाणचे तापमान हे अजूनही चाळीस अंशाच्या पुढे नोंदविण्यात आले आहे.
शहरात ढगाळ वातावरण
पुणे शहरातही गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त होत होती, पण पावसाने मात्र हुलकावणी दिली. ढगाळ वातावरणामुळे तापमानात थोडी घट झाली होती. तापमानाचा पारा 36 अंशांपर्यंत खाली घसरला होता. तापमानाचा पारा घसरला असला तरी उकाडा कायम होता. उन्हाचे चटके मात्र फारसे जाणविले नाहीत. पुणे शहरात येत्या चोवीस तासात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.