पुणे – “मंकीपॉक्स’ची लागण झालेल्या एकाही संशयित रुग्णाची नोंद झाली नसली तरी परदेशातून येणारे तसेच यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींवर लक्ष असल्याचे राज्य आणि महापालिकेचा साथरोग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच “राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’नेही त्या दृष्टीने नमुन्यांची काळजीपूर्वक तपासणी सुरू केली आहे.
मंकीपॉक्स रुग्णांची संख्या वाढत आहे. युरोपसह आतापर्यंत पंधरा देशांत हे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात अद्यापही त्याचा शिरकाव झाला नसला तरी देश, राज्य, शहर आणि गाव पातळीवर “अलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने याबाबत काही “गाइडलाइन्स’ जारी केल्या आहेत. त्या सगळ्या सूचनांचे पालन केले जात असल्याची माहिती राज्याचे साथरोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
मुख्यत्त्वे अतिनिकटच्या सहवासातून या रोगाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यातूनही जर लैंगिकसंबंध आल्यास तो अधिक तीव्रतेने संसर्ग होतो. या रोगाची लागण झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. हा बरा होणारा आजार आहे. याची लक्षणे तीन आठवड्यापर्यंत राहतात. मात्र इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून याबाबत विलगीकरणात राहणे जास्त आवश्यक असल्याचे डॉ. आवटे म्हणाले.
परदेशातून पुण्यात आलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवले जात आहे. विशेषत: “मंकीपॉक्स’चा प्रादुर्भाव ज्या देशांमध्ये जास्त आहे तेथून आलेल्या नागरिकांकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय, नायडू सांसर्गिक रुग्णालयात यासाठी विशेष कक्ष राखीव ठेवल्याची माहिती महापालिकेतील साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
संशयितांना विलगीकरणात ठेवणार
केंद्रीय रोग नियंत्रण केंद्राने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार जे प्रवासी गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्स बाधित देशांत जाऊन आलेले आहेत, त्यांना ताप, अंगावर पुरळ उठणे अशा लक्षणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. राज्याच्या साथरोग विभागाने या सूचना पुढे जिल्ह्याला दिल्या आहेत. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रोग्रामअंतर्गत अशा संशयित रुग्णांची माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन केले आहे.
संशयित किंवा बाधित रुग्णांना ते बरे होईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, याबाबत आम्हाला राज्याकडून विचारणा होत आहे. त्यामुळे रुग्णांचा नमुना लवकरच प्राप्त होऊ शकेलही. तो मिळाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल.
– डॉ. प्रिया अब्राहम, संचालक, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)