पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल, पंतप्रधान आवास योजना, विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांसाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून भांडवली विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या बिनव्याजी विशेष सहाय्य योजनेतून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान “पीएमआरडीए’ने मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा संपूर्ण प्रकल्प इलेव्हेटेड असणार आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा अडथळा ठरत होता. सुमारे दीड वर्षापूर्वी “पीएमआरडीए’कडून हा उड्डाणपूल पाडण्यात आला. तर सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी त्या जागी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे 570 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपूलासंदर्भात पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्या मध्यंतरी एकत्रित झालेल्या बैठकीत उड्डाणपुलासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या 50 टक्के खर्च महापालिकेने द्यावा, असे ठरले होते. त्यानुसार विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल उभारण्यासाठी सुमारे 270 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 135 कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, याशिवाय दोन भुयारी मार्ग आणि एक ग्रेस सेपरेटर बाधण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही खर्च विचारात घेऊन 435 कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, अशी विनंती “पीएमआरडीए’ने महापालिकेला प्रस्ताव पाठवून केली आहे.
मात्र महापालिकेने त्यास नकार दिला होता. मध्यंतरी पुन्हा राज्य सरकारकडे झालेल्या बैठकीत हा खर्च महापालिकेनेच द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महापालिकेने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. याशिवाय, पंतप्रधान आवाज योजनेंतर्गत घरे, रस्ते अशा विविध प्रकल्पांचे नियोजन “पीएमआरडीए’ने हाती घेतले आहेत. अशा सर्व प्रकल्पांसाठी “पीएमआरडीए’ला निधीची आवश्यकता आहे, या पार्श्वभूमीवर “पीएमआरडीए’ने राज्य सरकारमार्फत केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.