डेहराडून – उत्तराखंडची सत्ता राखणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक येत्या सोमवारी होणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. विधानसभा निवडणुकांना एकाच वेळी सामोऱ्या गेलेल्या पाचपैकी चार राज्यांत भाजपची सत्ता होती. त्या चारही राज्यांची सत्ता राखण्यात पक्षाने यश मिळवले.
मात्र, उत्तरप्रदेश वगळता उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील मुख्यमंत्री भाजपने अद्याप निश्चित केलेले नाहीत. उत्तरप्रदेशात सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्री बनण्यास योगी आदित्यनाथ सज्ज झाले आहेत. मात्र, इतर तीन राज्यांच्या नेतृत्वाविषयी सस्पेन्स कायम आहे. आता भाजपच्या बैठकीचा दिवस ठरल्याने उत्तराखंडविषयीच्या उत्सुकतेवर पडदा पडू शकेल.
पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची प्रथम पसंती मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हेच असल्याचे समजते. मात्र, निवडणुकीत ते स्वत:च पराभूत झाल्याने पक्षाची काहीशी गोची झाली आहे. अर्थात, धामी यांचा चेहरा पुढे करूनच सत्ता राखण्यात यश मिळाल्याचा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जाते. उत्तराखंडचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सत्पाल महाराज, धनसिंह रावत या ज्येष्ठ आमदारांबरोबरच खासदार अनिल बलुनी यांचीही नावे चर्चेत आहेत.