नवी दिल्ली – भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुनिओ किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये विधायक चर्चा झाली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या हेतून दोन्ही देशांच्या नेत्यांमधील वार्षिक शिखर बैठकीचे 14 वे सत्र आयोजित करण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही म्हटले आहे.
जपानचे पंतप्रधान झाल्यापासून फुमिओ किशिदा प्रथमच भारत भेटीवर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची ही पहिलीच भेट आहे. आज सकाळी त्यांचे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी किशिदा यांचे विमानतळावर स्वागत केले. आपल्या दौऱ्यादरम्यान भारत-जपान वार्षिक शिखर बैठकीदरम्यान किशिदा हे 42 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
यापूर्वीची भारत-जपान वार्षिक शिखर बैठक 2018 च्या ऑक्टोबरमध्ये टोकियोमध्ये झाली होती. या शिखर परिषदेमुळे दोन्ही बाजूंना विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्याची आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची संधी मिळेल. तसेच इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी त्यांची भागीदारी पुढे नेण्यासाठी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधीही दोन्ही देशांच्या नेत्यांना मिळणार आहे.