Mona lisa Painting : जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो द विंची यांनी काढलेले अजरामर चित्र म्हणजे ‘मोनालिसा’चे तैलचित्र. पॅरीसच्या लूवर या म्युझियममध्ये हे चित्र ठेवण्यात आले आहे. या चित्राच्या बाबतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण या प्रसिद्ध चित्रावर सूप फेकण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. चित्रावर बुलेटप्रूफ काच होती त्यामुळे या चित्राला काहीही झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन महिला कार्यकर्त्यांनी या काचेवर सूप फेकले, संग्रहालयातील सुरक्षेला चकवा देत त्या या ठिकाणी आल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या दोन महिलांनी हे कृत्य केले त्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घडल्या प्रकारानंतर चित्रासमोर काळ्या रंगाचा स्क्रिन लावला होता.
Protesters throw soup at iconic Mona Lisa painting in Paris
Read @ANI Story | https://t.co/foxoyrui5u#MonaLisa #Soup #EnvironmentalActivits #Paris #LouvreMuseum #France pic.twitter.com/Qdcs1GiAyw
— ANI Digital (@ani_digital) January 28, 2024
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, दोन महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी सरकार तसंच प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की अधिक महत्त्वाचं काय आहे कला की निरोगी आणि योग्य अन्नप्रणाली? कृषी व्यवस्था खराब आहे, शेतकरी काम करताना मरत आहेत. त्यामुळे पर्यावरण तसंच अन्न स्रोतांची गरज अधोरेखित व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असं या पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोनिलासाचे चित्र हे लूवर म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे. याआधी एका २०२२ च्या आंदोलनादरम्यान मोनालिसाच्या चित्रासमोरची काच दाबण्यात आली होती. तसेच ऑक्टोबर २०२२ मध्ये लंडन येथील नॅशनल व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या सूर्यफुलाच्या चित्रावर सूप फेकण्यात आले होते. इंधनाच्या वाढत्या किंमती, धोरणांमध्ये झालेले बदल यांचा निषेध करत नुकतीच काही शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये निदर्शनं केली होती. त्यानंतर आता मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संग्रहालयाने पोलिसात तक्रार केली आहे.