लॉकडाऊन काळात मोफत ऑनलाइन वर्ग
बिबवेवाडी – ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास शिकणे, पुढील पिढीस देणे तसेच मोडी लिपीचा प्रचार व प्रसार व्हावा, जुने मोडी दस्त वाचण्याकडे युवक आकर्षित व्हावेत या निस्वार्थी हेतूने लॉकडाऊन काळात मोडी लिपीचे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी व्हॉट्सऍप वरून लिंक पाठविण्यात आली होती. यानुसार 1021 जणांना यामध्ये संधी देण्यात आली असून यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि गोवा राज्यातील अनेकांचा समावेश आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील डॉ. घाळी महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक निलेश शेळके यांनी मोडी लिपीचे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण सुरू केले असून त्यास पुण्यासह अन्य राज्यातील नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावातून सारे जग ठप्प झाले आहे. अशा स्थितीतही तब्बल 1021 जण मोडी लिपी शिकण्यासाठी इच्छुक आहेत. यातून लोप पावत असलेल्या मोडी लिपिचे धडे गिरवले जात आहेत. करोनामुळे महाविद्यालयीन कामकाज बंद असल्यामुळे घरी थांबणे अपरिहार्य असल्याने प्रा. शेळके यांनी विद्यार्थी तसेच नागरिकांना काहीतरी देण्याचा विचार केला. यातून मोडी लिपीच्या अभ्यास क्रमाचे व्हिडिओ त्यावर आधारित प्रश्नपत्रिका तयार केली. यासाठी प्रा. महेश वंडकर यांचे सहकार्य मिळाले. मोडी लिपीचा सात दिवसांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्यांना दररोज, सकाळी सात वाजता एक व्हिडीओ पाठविला जातो. दिवसभरात सोयीनुसार अभ्यास करावयाचा असून आठव्या दिवशी परीक्षेचे नियोजन आहे. यातून प्राचीन काळाची आपल्या इतिहासाची जर माहिती घ्यायची झाल्यावर बहुतेक कागदपत्रे ही मोडी लिपित असतात. मोडी लिपीची अकारण असलेली भीती या प्रशिक्षणामुळे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.