मुंबई – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असून महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांत त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआरही नोंदवण्यात आले आहेत. कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत, मात्र एक महिन्याहून अधिक काळ धरणे होऊनही तसे झालेले नाही.
दरम्यान, मंगळवारी (६ जून) क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेचे खुले आमंत्रण दिल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून लिहिले, सरकार कुस्तीपटूंशी चर्चेसाठी तयार आहे. तत्पूर्वी, अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर बजरंग पुनिया म्हणाले होते की, ;गृहमंत्र्यांनी लवकरच हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, याप्रकरणी साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियान यांचे वक्तव्यही समोर आले आहे. गृहमंत्र्यांकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळाला नाही, असे ते म्हणाले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत कुस्तीपटू 18 जानेवारीपासून निदर्शने करत आहेत. सर्वप्रथम जानेवारीत जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी आंदोलन केले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला कुस्तीपटूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केली.
तेव्हा त्यांनी याप्रकरणी कुस्तीपटूंना कारवाईचे आश्वासन दिले होते. यानंतर 23 एप्रिल ते 28 मे या कालावधीत कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. 28 मे रोजी नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त संसद मार्च काढणाऱ्या पैलवानांना मैदानावरून हटवण्यात आले. कुस्ती संघटनेचे अध्यक्षपद एका महिलेला द्यावे, असे मल्लांचे स्पष्टपणे म्हणणे आहे. याशिवाय ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने संघात प्रवेश करू नये.