औरंगाबाद – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नुकतीच टीका केली होती. यावेळी पडळकरांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले होते. यासह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पवारांवर टीका करताना एकेरी भाषेचा उपयोग केल्याचे पाहायला मिळाले होते. आता या सर्व टीकेबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांवरील या टीकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी या टीकेबाबत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या एकेरी उल्लेखावर विचारलं असता शरद पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ठीक आहे, त्यांना कशाला महत्त्व देता.” तसेच यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या धार्मिक वातावरणाबाबत देखील भाष्य केले.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते पवारांबाबत
“गेल्यावर्षी शरद पवारांनी चौंडीत जाऊन अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यंदा शरद पवार का आले नाहीत? ते चार वेळा मुख्यमंत्री होते, 12 वर्ष केंद्रात मंत्री होते. 1999 पासून राज्यात त्यांचे सरकार होते. तेव्हा एकदाही ते आले नव्हते. गेल्यावर्षी चौंडी त्यांना आपल्या हातातून काढून घ्यायची होती”, असे म्हणत त्यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता”