मोदी, निवडणूक आयोग दुसऱ्या लाटेस जबाबदार

शिवसेनेचा आरोप: आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर तोंड लपवायची वेळ

मुंबई -निवडणुका झालेल्या किंवा होत असलेल्या राज्यांतून अनेक पट वेगाने करोनाचा फैलाव देशभरात झाला. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग आणि मोदी सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

करोना संकटामुळे देशभरात पुन्हा चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मोदी सरकार, निवडणूक आयोगाबरोबरच भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मोदी सरकार करोना संकट गांभीर्याने घ्यायला तयार नाही. राजकारणाचा डोस कमी करून त्या सरकारने करोना युद्धावर लक्ष केंद्रित केले असते; तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. पण, त्या सरकारने मधल्या काळात देशाची राजधानीच पश्‍चिम बंगालमध्ये हलवली. त्यानंतर दिल्लीचा ताबाही करोनाने घेतला. एकदा राजधानीच पडल्यावर देश पडायला किती वेळ लागतोय, असा बोचरा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

करोनाची पर्वा न करता मोदी सरकारने निवडणुका आणि राजकीय स्वार्थासाठी देशात करोनाची लाटच निर्माण केली. सध्या देशात ऑक्‍सिजन, रेमडेसिविर, रूग्णालयांचे बेड, व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. शववाहिन्या आणि स्मशानांत दाटीवाटी होत आहे. मात्र, मोदी सरकार बंगालमधील निवडणूक खेळात दंग आहे. भाजप कार्यकर्ते बंगालमधून करोनाची भेट घेऊन आपापल्या राज्यांत परतत आहेत, अशी टिप्पणी त्या अग्रलेखात करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र करोना युद्धात अपयशी ठरत असल्याची भाषा केली. आता त्यांच्यावर उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशसारख्या भाजपशासित राज्यांनी तोंड लपवायची वेळ आणली आहे, असा शाब्दिक टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.