मनसेकडून कार्यक्रमाच्या “केम छो मिस्टर प्रेसिडेंट” या नावावर आक्षेप
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प येणार असल्याने अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला केम छो मिस्टर प्रेसिंडेंट असं नाव देण्यात आलं आहे. मनसेने कार्यक्रमाच्या नावावर आक्षेप घेतला असून केम छो का? अशी विचारणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 24 फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि त्या कार्यक्रमाचे म्हणे नाव असणार आहे केम छो मिस्टर प्रेसिडेंट?…केम छो?…केम छो का?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. “केम छो?”.. “केम छो” का?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 12, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास भारत आणि अमेरिकेने व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प भारतभेटीवर येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात ट्रम्प हे दिल्ली आणि अहमदाबादला भेट देऊन तेथील अधिकृत कार्यक्रमांत सहभागी होणार असून, विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया याही भारत दौऱ्यावर येणार असल्याचे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव स्टेफनी ग्रीशम यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठी दुपारची वेळ निश्चित करण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडिअममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात जवळपास एक लाख लोक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी, व्यवसायिक, अनिवासी भारतीयांना निमंत्रित करण्यात आल आहे. ट्रम्प तेथून साबरमती आश्रमला जाणार आहेत.