अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात तीन दिवस ठिय्या
पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधींची घेणार बैठक
पुणे – लोकसभेत मनसेने आपले इंजिन चालवले नाही; परंतु “लाव रे तो व्हिडिओ’ हा डायलॉग मात्र फेमस केला. आता त्यांनी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीला सुरूवात केली असून, पुणे शहर, जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि शाखा प्रमुखांची बैठक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलावली आहे. आज भोसले नगर येथील अशोक सोसायटीच्या हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुरु होणाऱ्या बैठकीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा करुन घेतले जात असल्याचं कळतंय. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत गुप्त चर्चा होणार असल्याचं उघड आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकांवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी भाजप विरोधी प्रचार केला.
भाजप सरकारची निष्क्रीयता आणि त्यांनी दिलेली आश्वासने किती फोल आहेत, असे सांगत त्यांनी पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग विरोधी बाकावर बसणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांना झाला नाही. मनसे आगामी विधानसभा निवडणुकांध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत काय निर्णय घेते याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.