टिळक चौकातच सभा घेऊ, सत्ताधाऱ्यांना मनसे आव्हान.
भररस्त्यात सभा घेऊन सत्ताधाऱ्यांची पोलखोल करण्याचा निर्धार.
पुणे : लाव रे तो व्हिडीओ म्हणत सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात जागाच न मिळवून देण्याचे राजकारण शिजत आहे. अशावेळी भररस्त्यात सभा घेऊन सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचे नियोजन मनसेकडून केले जात आहे. शहरात लोकमान्य टिळक चौकात सभा घेऊन सत्ताधाऱ्यांचा पोलखोल करण्याचा निर्धार केला आहे.
याबाबत मनसेच्या एका स्थानिक नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सभेसाठी मैदान मिळू न देण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक चौकातच सभा घेणार आहोत. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. 9 तारखेला पुण्यात त्यांची सभा होणार आहे.
पुण्यात काही लढती लक्षवेधक होणार आहेत. त्यात अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज यांच्या सभेत ते काय बोलतात? याबाबत उत्सुकता आहे.