आमदार संजय शिरसाट यांचे ट्विट म्हणजे त्यांचा अंतरात्म्याचा आवाज होता – महेश तपासेमुंबई :- आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्विट हे तांत्रिक चुकीमुळे नव्हते. तर तो त्यांचा अंतरात्म्याचा आवाज होता, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
आमदार संजय शिरसाट यांच्याप्रमाणेच अनेक आमदारांना आपण चूक केली असल्याचे वाटायला लागलं आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
ट्विट डिलीट करून लगेच ते तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी त्यांच्या चेहर्यावरील भाव आणि देहबोली खूप काही स्पष्ट करत होती असेही महेश तपासे म्हणाले.
बंडखोर आमदारांना सत्तेचे आमिष दाखवून घेण्यात आल्याचे कारस्थान भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले हे आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटवरून दिसून येते, असा थेट आरोप महेश तपासे यांनी केला. तसेच जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत असल्याचेही ते म्हणाले.