नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार तोंडसुख घेतले आहे. या पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी इच्छुक असलेल्या दोन डझनपेक्षा जास्त उमेदवारांची प्रतीक्षा यादी असल्याची टीप्पणी त्यांनी केली आहे.
नक्वी म्हणाले की, काही जणांना मोदी फोबियाचा राजकीय आजार आहे. मात्र हा आजार असलेले लोक लवकरच गायब होतील. या निराशावादी राजकीय लोकांचे चेहरे आणि दिखाउपणा कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कठोर कष्ट आणि प्रामाणिकपणाचा पराभव करू शकत नाही. या लोकांनी अगोदरच पंतप्रधान पदासाठी दोन डझन उमेदवारांची यादी तयार करून ठेवली आहे.
याला व्हॅनिटी विदाऊट व्हॅकन्सी असेच म्हणतात. राजकीय असहिष्णुता आणि खोटे मनमानी आरोप होत असतानाही मोदी समावेशक सशक्तीकरणाचे कार्य अथकपणे आणि अत्यंत निष्ठेने करत आहेत. त्यांच्यासाठी देशाची सुरक्षा आणि प्रतिष्ठा हीच राष्ट्रनिती आहे आणि प्रत्येक गरजूचे कल्याण करणे हाच राष्ट्रधर्म आहे. भारताचा तिरंगा आपल्या सगळ्यांना एकजुट करतो आणि देशासाठी काहीतरी कार्य करण्यासाठी प्रेरित करतो.