चंदीगड – पंजाबमधील भगवंत मान सरकारच्या एक आमदार एक पेन्शन योजनेला राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंजुरी दिल्यामुळे त्या राज्यात आता ही योजना लागू झाला आहे. पंजाबमध्ये पूर्वी एखादी व्यक्ती पाच वेळा आमदार झाली तर त्या नेत्याला पाच वेळा पेन्शन मिळत होते. मात्र आता नव्या निर्णयानुसार पाच वेळा आमदार राहीले असले तरी पेन्शन मात्र एकदाच मिळणार आहे.
आमदारांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर त्यांना 60 हजार रुपये पेन्शन आणि डिए दिला जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत मान यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच हा निर्णय घेऊन तो विधानसभेत मंजूर करून घेतला होता. मात्र त्याबाबतची फाइल राज्यपाल पुरोहित यांच्याकडे मंजुरीसाठी प्रलंबित होती. अखेर राज्यपालांनीही त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता याबाबतच्या अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये आमदारांना अनेक पेन्शन मिळण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 19.53 कोटींचा बोजा पडत होता. काही आमदारांना तर 5 लाख रुपये पेन्शन मिळत होती. हा प्रकार आता बंद करण्यात आला आहे.